Saturday, January 20, 2007

हे काय नाटक चालवलं आहे ?



"रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक ह्यांना विनम्र अभिवादन सुयोग सहर्ष सादर करीत आहे, दोन अंकी धम्माल नाटक, 'दादाची गर्लफ़्रेंड'. लेखक- रत्नाक्रर मतकरी,दिग्दर्शक- विजय केंकरे... "

नाटक चालू होण्याच्या आधीच्या ह्या तितक्याच परिचयाच्या आणि तरीही तितक्याच गोड ओळी. मराठी मनाच्या खास कप्प्यातल्या. आजतर काय सुरेख योग जुळून आला होता! रविवार दुपारी ४ ची निवांत वेळ, सुयोगच नाटकं ,ते ही रत्नाकर मतकरींनी लिहीलेलं, विजय केंकरेनी दिग्दर्शीत केलेलं, "क्या बात है!" मनाशीच म्हटलं आणि खुर्चीतल्या खुर्चीत सरसावून बसलो.

नाटक वेळेवेर चालू झालं. अपेक्षेप्रमाणे ह्या नाटकाच्या मध्यवर्ती भूमिकेतला एक लहान मुलगा, त्याचा एक देखणा असा दादा आणि त्याची एक गर्लफ़्रेंड ह्या तिघांना घेऊन गुंफ़लेलं हे नाटक. थोड्याच वेळात ते रंगायला देखील लागलं. लहानग्या दिसणा-या त्या मुलाच्या अभिनय कौशल्याने लोक चकित झाले होते. सगळं कसं छान चाललं होतं..

पण तितक्यात तो सीन आला, नाटकातली ती 'गर्लफ़्रेंड' संवाद म्हणत असते, "...आणि त्याने मग माझ्या ब्लाऊजची बटनं काढली, आणि मग ब्रा चा हूक सुद्धा!"...पहील्यांदा तर मी हे प्रत्यक्ष ऐकतोय ह्या गोष्टीचा माझ्यावर विश्वासच बसेना!दोन मिनीटं काही कळलच नाही! आजूबाजूच्या प्रेक्षकातूनही हे संवाद ऐकून चुकचुकण्याचा आवाज ऐकू आला. त्यात आईबाबा बाजूला! ज्यांनी प्रगल्भ नाटकांची एक परंपरा अनुभवली, त्या माझ्या आई-बाबांना असले संवाद असलेलं नाटक दाखवायला मी आणलं, ह्या विचारानेच मला प्रचंड ओशाळल्यागत झालं. इतरांचं माहीत नाही पण मलातरी पुढे त्या नाटकात काय झालं हे कळलं नाही. एकिकडे नाटकातील कलावंत मनापासून कला सादर होते आणि दुसरीकडे मी शून्य नज्ररेने त्यांच्याकडे पहात होतो. मनात विचारांचा हलकल्लोळ, ही दोन वाक्य टाळता आली नसती?काय साधलं लेखक/दिग्दर्शकांनी ती वाक्य अशीच ठेवून? मोठ्या मुश्कीलीने ती दुपार विसरलो....

...नंतर स्वत:लाच समजावलं, अरे,असतं नाटकात एखाद दुसरं वाक्य असं. त्यासाठी संपूर्ण नाटकाला कशाला नावं ठेवायची? कलावंतानी काही कमी मेहनत घेतली असेल नाटक बसवायला? शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धेचे दिवस आठव. पाच मिनीटांच भाषण (ते ही इतर ५ जणांकडून उचललेलं!). साधं सलग म्हणताना पण हजारदा अडखळायला व्हायचं. देहबोली,शब्दांची फ़ेक हे तर दूरच राहीलं. दुस-यांना बोलण्याआधी स्वत:कडे पहाव एकदा!

जाऊ दे ना, असं म्हणून नेहमीप्रमाणे कामाला लागलो. ही गोष्ट विसरूनही गेलो.

काही दिवसांनी मी पुण्याला ऑफ़ीसमध्ये असताना बाबांचा फ़ोन आला, "अरे, ह्या शनिवार-रविवार येणार आहेस ना घरी नेहमीसारखा?" मी म्हटलं, "हो. पण असं का विचारताय? "नाही अरे, शनिवारी नाटक आहे प्रबोधनला ,'एक डाव भटाचा'. कलाकार नवीन आहेत पण नवीन कलाकारांना आपण नाही प्रोत्साहन द्यायचं तर कुणी? तसही बरेच ऍवार्ड्स वगैरे मिळालेलं नाटक आहे,चांगलच असेल! येणार असशील तर तिकीटं काढतो." मी म्हटलं "त्यात काय विचारायचं ? बिनधास्त काढा तिकीटं!"

त्यावेळी हो म्हट्लं खरं, पण हे नाटक आधीच्यासारखं निघाल तर उगीच विकतचा मनस्ताप होईल अशी एक शंकेची पाल मात्र चुकचुकून गेली आणि अगदी तस्सच झालं. हे नाटक पहाणं ही माझी अजूनही मोठी चूक होती. हे म्हणजे आगीतून निघून फ़ोफ़ाट्यात गेल्यासारखं! आधीच्या नाटकामध्ये तर निव्वळ दोन ओळी आक्षेपार्ह वाटल्या होत्या, पण ह्या नाटकाने कहरच केला! नाटकात तर चक्क अर्धा तास सलग, चारचौघात ऐकायलाही अश्लील वाटावेत असले 'बेडरूममधले आवाज' आणि नंतर मधेमधेही द्विअर्थी संवाद खुशाल पेरलेले! आता ओशाळण्याची वेळ बाबांवर होती. ह्यापुढे तर हया नाटकाबद्द्ल इथे लिहावसही वाटत नाही. शी!...

अरे, आम्ही समजत होतो मराठी नाटक म्हणजे 'निखळ' मनोरंजन. काय नाही दिलं आम्हाला नाट्कांनी? ऑल दी बेस्ट, यदाकदाचित, लोच्या झाला रे, सही रे सही ह्या नाटकांनी आम्हाला पोट फ़ुटेपर्यंत हसवल. दिलीप प्रभावळकरांचं 'हसवाफ़सवी'आम्ही कसं विसरू शकतो? 'जाणून बुजून', 'मि.नामदेव म्हणे'अशा नाटकांनी
परिस्थीतीची जाणीव करून देऊन थक्क करून सोडलं. 'मित्र', 'नकळत सारे घडले' अशा नाटकांनी जगण्यातली प्रगल्भता काय असते हे दाखवून दिलं. श्रीराम लागूंचं 'नटसम्राट'..नाव लिहीताना पण हात आदराने थरथरतात रे!..आणि त्याच रंगभूमीवर ही असली नाटकं करताना लाज नाही वाटत? कुठे चाललोय आम्ही ? आम्ही फ़ॉरवर्ड की आम्ही बॅकवर्ड?

एकीकडे सगळी मनोरंजनाची साधनं दिवसेंदिवस ताळतंत्र सोडत असताना मराठी नाटकांनीही शाब्दीक अश्लीलतेकडे झुकावं हे आम्हा रसिकांना सर्वस्वी अमान्य आहे. नवीन पिढी हाताबाहेर गेल्याचा ठपका सतत आमच्या पिढीवर ठेवला जातो, पण आम्ही ज्या पिढीला सुसंस्कृत समजतो; ती नाटकं निर्माण करणारी आमची मोठी पिढीही असं वागली तर आम्ही आदर्श ठेवावेत ते कुणाचे? आत्ताच जर ही परिस्थिती असेल तर आमच्या पुढच्या पिढीपर्यंत काय परिस्थीती असेल? त्यांनी कुणाचा आदर्श ठेवायचा? छे! सगळच सुन्न करणारं आहे... मराठी नाटकांनाही जर आता असल्या थिल्लर संवादांमुळे, 'फ़क्त प्रौढांसाठी' असा फ़लक लावायला लागला तर अनेक दिग्गजांनी अजरामर केलेल्या त्या रंगभूमीचं ह्या सारखं दुसरं दुर्दैव नसेल..


आजकाल नाटकांना प्रेक्षक मिळत नाही अशी ओरड चालू आहे. अशा नाटकांना उथळ प्रेक्षक गर्दी करत असतीलही, पण अस्सल दर्दी रसिक मात्र रंगभूमीपासून दूर जाईल ह्याची निर्मात्यांनी खात्री बाळगावी. आजच्या स्पर्धेच्या काळात रंगमंचावरील कलाकारांना काम मिळून त्यात उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवणे ही कठीण गोष्ट आहे ह्याचीही आम्हाला जाणीव आहे. पण स्पर्धेच्या ह्या युगात प्रत्येक क्षेत्रातच स्पर्धा आहेच.आम्ही आमच्या क्षेत्रातही स्पर्धेचा सामना करतच आहोत, त्यामुळे केवळ हे निमित्त पुढे करून अशा थिल्लर संवाद असलेल्या नाटकात काम करण्याची तडजोड कलाकारांनी करू नये ही आमची कळकळीची विनंती.

ह्या नाटकाशी संबंध असलेल्या निर्मिती संस्था, त्यात काम करणारे गुणी कलावंत, ह्या सगळ्या बड्या मंडंळीना अधिकारवाणीने सांगण्यासाठी माझं कर्तुत्व त्यांच्या जवळपासही फ़िरकत नाही. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हा तर यत्किंचीतही प्रयत्न नाही. पण तरीही एक रसिक प्रेक्षक म्हणून नाटक पहाताना मला ज्या गोष्टी आवडल्या नाही त्या नाहीतच आणि त्या सगळ्या ज्या तीव्रतेने मला जाणवल्या त्याच तीव्रतेने त्या निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा खटाटोप! हे सगळं इतक सरळ आणि स्पष्ट आहे..


मध्यंतरी डॉ.गिरीश ओकांच्या चिवित्रा ह्या सदरात वाचलं होतं, नेमके शब्द आठवत नाहीत पण आशय काहीसा असा होता, "नियती धोक्याच्या क्षणी आपल्याला पिवळा सिग्नल दाखवत असते. जसं सर्दी होण्याआधी आपल्याला शिंक येते अगदी तसं. आपल्यला खरतर थांबण्याचा इशारा देणारा तो सिग्नल पाहून थांबायच की त्याकडे दुर्लक्ष करून आपली गाडी जोरात दामटायची हे वेळीच ठरवणं फ़ार महत्वाच आहे. अन्यथा परिणामांना सामोरे जाणारे आपणच असतो." ह्याहून अधिक सांगणे नलगे!

एक 'सुसंस्कृत नाट्यप्रेमी' रसिक
योगेश पितळे


email-- yoursyogesh@gmail.com